महाराष्ट्र उष्णतेने होरपळला! उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू संभाजीनगर झाले घामाघूम !!

Foto
मुंबई: राज्यभरात उन्हाची काहिली वाढली असून, अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळिशीच्या पलिकडे गेला. सोमवारी उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू झाला. अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यात या घटना घडल्या. देशभरात उष्णतेची लाट आल्याने गेल्या चार दिवसांपासून सरासरीच्या तुलनेत सगळीकडे तापमान अधिक नोंदविण्यात येत आहे. महाराष्ट्रातही परिस्थिती वेगळी नाही.  मराठवाड्यात उष्णतेची लाट आल्यासारखी परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात सोमवारी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्यान हवामानातील घडामोडींमुळे पुढील चार दिवसांत पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील तापमानात टप्प्याटप्याने घट होणार आहे. पुण्यात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील; पण पाऊस पडणार नाही. विदर्भात पुढील दोन दिवसांत वादळीवार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले.

अहिल्यानगरमध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या बहिणीला भेटायला भर उन्हात गेलेल्या भावाचा उष्माघातामुळे रुग्णालयाच्या दारातच मृत्यू झाला. दिगंबर जनार्दन वाकचौरे (४५) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. भर दुपारी कळस येथून संगमनेर येथे बहिणीला भेटायला ते दुचाकीवरून आले होते. उन्हाचा त्रास झाल्याने त्यांनी रुग्णालयात पोहोचल्यावर थंड पाण्याची बाटली डोक्यावर ओतली. मात्र, तेथेच ते चक्कर येऊन पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ४० ते ४१ अंश सेल्सिअस तापमान आहे.

दुसर्‍या घटनेत, जळगाव जिल्ह्यात विवाहसोहळ्याहून आल्यानंतर रात्री घरी न परतलेले लोधू नामदेव पाटील (६०) यांचा मृतदेह सोमवारी सकाळी एसटीच्या कार्यशाळेजवळ आढळला. दिवसभर लग्नसोहळ्यात फिरल्यानंतर त्यांना उन्हाचा फटका बसला असावा, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात सोमवारी कमाल तापमान ४४.६ अंशावर पोहोचले होते.

पुण्यात पारा ४२ अंशांवर
पुणे शहरात सकाळपासून वाढत गेलेली उन्हाची तीव्रता, उष्णतेच्या झळा आणि घामाच्या धारांनी पुणेकर सोमवारीही हैराण झाले. रविवारी उन्हाने वातावरण तापले होते, रात्री उकाड्याने असह्य झाले आणि सोमवारीही हेच वातावरण अनुभवायला मिळाले. शहरात ३९.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले, तर शिवाजीनगर येथे या हंगामातील उच्चांकी २४.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

अमरावती ४६.६, वर्धा ४६.५
नागपूर : विदर्भ सध्या उष्णतेच्या भीषण झळांनी होरपळत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. जगात तापमानाचा उच्चांक गाठणारे शहर म्हणून अकोल्याची नोंद झाली. सोमवारी अमरावतीत ४६.६, वर्धा ४६.५ तर अकोल्यात ४६.३ अंश सेल्सिअस तापमान होते. कडक उन्हामुळे रस्त्यांवरची वर्दळ कमी झाली असून दुपारी रस्ते ओस दिसतात. हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे संकेत दिले असल्याने, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. चंद्रपूर येथे पाच दिवसांपासून किमान तापमान २९ अंश सेल्सिअसवर आहे.